पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कासारवडवली तलावाची श्रमदानानं सफाई.

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तरूणांनी कासारवडवली तलाव स्वच्छ केला. कासारवडवली येथील तलावाचं संवर्धन करण्याची मोहिम आखण्यात आली होती. विहंग सरनाईक यांच्या ठाणे युनायटेड या संस्थेच्या पुढाकारानं आणि स्थानिक नागरिक तरूणांच्या सहभागानं कासारवडवली तलाव श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला. यापुढे दर रविवारी तलाव स्वच्छता मोहिम सुरू ठेवली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. एकेकाळी शहरामध्ये ७० हून अधिक तलाव होते. त्यापैकी आता निम्मे तलाव शिल्लक राहिले आहेत. शिल्लक राहिलेल्या तलावांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तलावांचं संवर्धन व्हावं म्हणून विहंग सरनाईक यांनी सरोवरम ही तलाव संवर्धन मोहिम राबवण्याचं जाहीर केलं होतं. त्याला बीच वॉरियर्स या तरूणांच्या गटानं पाठिंबा दिला आणि या तलाव स्वच्छता मोहिमेत अडीचशेहून अधिक जण सहभागी झाले. सकाळपासून तलाव स्वच्छतेसाठी श्रमदान सुरू करण्यात आले. तलावात सर्वात जास्त प्लास्टीक मिळून आलं. पूजेसाठी वापरली जाणारी मडकी, पूजेचं साहित्य, विसर्जित केलेल्या मूर्ती एकत्रित करण्यात आल्या. पालिकेचे १२ सफाई कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले होते. दोन तासांच्या श्रमदानातून ४ टन हून अधिक कचरा गोळा करण्यात आला. तलाव स्वच्छ करण्यासाठी कोणतीही यंत्र न वापरता श्रमदान करून ही मोहिम राबवण्यात आली. आजपासून आम्ही या तलावाची स्वच्छता दर आठवड्याला करणार असून प्रत्येक ठाणेकरानं आपल्या भागातील तलावांची काळजी घेऊन या मोहिमेत सहभाग घेतल्यास सरोवरम् मोहिमेचं सार्थक होईल असं विहंग सरनाईक यांनी सांगितलं. ही तलाव संवर्धन मोहिम फक्त एक दिवसापुरती नसून जोपर्यंत सर्व तलाव स्वच्छ आणि चांगले होत नाहीत तोपर्यंत सुरू राहील. ठाण्यातील पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेशी जोडले जावे असं आवाहन सरनाईक यांनी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading