परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल – स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

देशाच्या परराष्ट्रीय धोरणात गेल्या ५ वर्षात झालेला आमुलाग्र बदल देशासाठी अनुकुल ठरत असून परराष्ट्र धोरण राबवताना निर्णयाला न घाबरणं आणि निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करणं तसंच तडजोड न करता लवचिकता स्वीकारणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ५ वर्षातील परराष्ट्र धोरणाचं सूत्रं असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी केलं. इस्त्रायलच्या भारतीय दूतावासात कार्यरत असणा-या अनय जोगळेकर यांनी लिहिलेल्या भारतीय परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितीजं या पुस्तकाच्या निमित्तानं दिनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. आक्रमक चीनची लहान देशांना वाटणारी भीती, यामुळं निर्माण होणा-या अगतिकेतून छोट्या देशांची मोदी यांच्या सहकार्य, सहमती, संवाद या धोरणातून सुटका होत असल्याचं तोरसेकर यांनी सांगितलं. सध्या राष्ट्र प्रथम या धोरणातून आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध प्रस्थापित केले जात आहेत. डावपेच आणि धोरण अशा दुहेरी तंत्राचा वापर केला जात आहे. आखाती देशात वंदे मातरम् चा सूर, मंदिर निर्मिती, योगदिन अशी अनेक उदाहरणं ही मोदी नितीची झलक असल्याचंही तोरसेकर यांनी सांगितलं. मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अलिप्तवादाच्या पिंज-यातून देशाला बाहेर काढलं आणि परराष्ट्र धोरण राष्ट्रीय हिताशी संलग्न केलं. दोन गटात विभागल्या गेलेल्या जगात दोघांपासून एक समान अंतर ठेवलं असं अनय जोगळेकर यांनी सांगितलं. भारताच्या शेजारील देशांना सौर उर्जेसाठी संघटित करणं ही नरेंद्र मोदींची मोठी कामगिरी असून परराष्ट्र धोरणात सुसूत्रता, सातत्य आणि भारत हित याला मोदींचं प्राधान्य असल्याचं पत्रकार अरूण करमरकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading