निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

कोपरी सिध्दीविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आल्याने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. ठाणे शहरातील रस्ते, विविध विकास कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिका आयुक्त पाहणी करीत असून त्यांनी काल कोपरीतीलअष्टविनायक चौक तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी, कळवा, साकेत परिसरात सुरू असलेल्या वाँटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांचा आढावा घेतला.
अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना सांगितले की, कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले असून त्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. या पाहणी दौ-यात कामाचा दर्जा निकृष्ट करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. तसेच या प्रकरणी कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांना समज देण्यात आली. जरी कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले तरी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. त्यामुळे कंत्राटदाराने परस्पर काम केले हा अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. याबाबत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकल्याचा कार्यकारी अभियंत्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधितांचा खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात आली. कोपरी येथील गणेश विसर्जन घाटाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये शिल्पांवर प्रकाश योजना करणे, घाटातून बाहेर पडण्याच्या गेटच्या डावा बाजू परिसरात कचरा टाकला जातो ते पूर्णतः बंद करावे. एम्पिथिअटर, गार्डन आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता, निगा राखली जाईल यासाठी येथे एक सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच कोपरी परिसरात उभारण्यात येणारे सभागृह आणि वाँटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचे उर्वरीत काम एक महिन्याच्या आत पुर्ण करा, तसेच येथे असणारे निर्माल्य कलश अस्ताव्यस्त असून ते तातडीने सुस्थितीत ठेवण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कळवा वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. कळवा पुलाचे काम सुरु असताना जे ब्लॉक लावण्यात आले होते ते अद्याप तसेच पडून आहेत ते हटविण्यात यावे, ब्रिजच्या खांबाना रंगरंगोटी करण्यात यावी, दगडी बेंचच्या कामामध्ये गँप्स असून त्या भरण्यात यावे. तसेच येथे बनविण्यात आलेल्या गार्डन परिसरात मुलांना खेळण्याची जागा उपलब्ध करुन देण्यात यावी जेणेकरून मुले खेळाचा आनंद लुटतील,अशा सूचना करतानाच आयुक्त बांगर यांनी केल्या. यावेळी कळवा पुलाच्या खांबावर जाहिराती लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच त्याची दखल घेत पुलाच्या खांबावर जाहिराती लावणा-यांवर कारवाई करा असे निर्देश सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना दिले. साकेत येथील वॉटर फ्रंटची पाहणी दरम्यान तेथील गार्डन मधील जॉगिंग ट्रॅकचे कोपऱ्यांची कामे सुयोग्य पध्दतीने झालेली नाहीत ती सुयोग्य पध्दतीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्यानात बैठक व्यवस्थेत वाढ करुन गझिबोंची रचना करावी. जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी यावेत यासाठीलहान मुलांची खेळणी, ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी अशा सुचनाही आयुक्तांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading