जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांना भेट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेली नडगाव क्लस्टरमधील कामे, वनराई बंधाऱ्यांची कामे तसेच जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कार्ड वाटप आदी शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाने नुकतेच जिल्ह्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन पाहणी केली.
आदिवासी विकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून नडगाव येथील उपसा जलसिंचन योजनेस जिंदल आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली. जिल्हा नियोजन समितीच्या 50 लाख निधीतून 40 शेतकऱ्यांनी एकत्र येत 27 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड सुरू केली आहे. या प्रकल्पाचे हे पहिलेच वर्ष असून शेतकऱ्यांनी भेंडी, काकडी, घोसाळे, मिरचीची लागवड केली आहे. नडगाव क्लस्टर प्रकल्पास पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना कृषि अधिकाऱ्यांनी त्यांनी यावेळी दिल्या.
यानंतर जिंदल यांनी हिव ग्रामपंचायतीस भेट दिली. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड वाटपाची मोहिम येथे सुरू आहे. यावेळी ग्रामस्थांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्डचे वितरण करण्यात आले. संपूर्ण 100 टक्के ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी हिव गावातील अंगणवाडीची पाहणी केली आणि बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराची स्वतः खाऊन तपासणी केली. तसेच अंगणवाडीतील मुलांसोबत वेळ घालविला. एकही बालक मॅम श्रेणीत राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिंदल यांनी यावेळी दिले.
गावातील शाळेस भेट देऊन विविध संस्थांमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होत असलेल्या कामांची पाहणी केली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी शिक्षकांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर हिव आरोग्य उपकेंद्र, शेंद्रुण येथील वनराई बंधारा, वाशिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शहापूर दौऱ्यावर असताना एका वीट भट्टीला भेट देऊन कामगारांच्या मुलांना महिला आणि बालकल्याण विभागाकडील आहार योजनेचा लाभ देण्याच्या सूचना केल्या. तसेच ही मुले शाळाबाह्य राहू नये, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत विट भट्टी मालकानेही दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. या मुलांच्या प्रगतीसंबंधात कोणतीही कुचराई करू नये असेही मनुज जिंदल यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading