नाले सफाईबाबतच्या सूचना आणि तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

शहरात सर्वत्र सुरू असलेली पहिल्या टप्प्यातील नाले सफाईची कामे २५ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच नाले सफाईबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना तक्रारी यांची तातडीने दखल घेवून त्यावर उपाय करावा असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. नालेसफाई करणारे कंत्राटदार, त्यावर लक्ष ठेवणारे स्वच्छता निरीक्षक, त्यांचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त ही वरिष्ठ यंत्रणा यांच्याशी नाले सफाई बद्दल आयुक्तांनी थेट संवाद साधला. आयुक्तांपासून ते प्रत्यक्ष नाल्यात उतरून काम करणाऱ्या कामगारांपर्यंत सगळ्यांचे काटेकोर नालेसफाई हेच लक्ष्य आहे. हा संदेश देण्यासाठी ही बैठक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त हे प्रभागातील संपूर्ण नाले सफाईच्या कामाचे समन्वयक आहेत. घन कचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी, यांत्रिकी, विद्युत आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे सर्व विभाग एकत्रितपणे काम करतील. २५ मे पर्यंत पहिल्या टप्प्यातील नाले सफाई पूर्ण होईल, याला सगळ्यांचे प्राधान्य राहील. त्यानंतर, नाल्यात पडलेला कचरा, पावसाळ्यात वाहून येणारा कचरा, पाणी साठण्याच्या ठिकाणची पावसाळी गटार सफाई आणि पावसाळ्यानंतरची सफाई असे नाले सफाईच्या कामाचे टप्पे असतील. नाले सफाईच्या कामाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जात आहे. त्यातून आधीची आणि नंतरची स्थिती समजणार आहे. त्यामुळे हे काम काळजीपूर्वक करावे. तसेच, नाल्यात प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कामगारांना गमबूट, हातमोजे आणि मास्क असेलच पाहिजेत याबद्दल दक्षता घेतली जावी. त्यांच्या आरोग्यास धोका पोहोचणार नाही. याची काळजी कंत्राटदारांनी घ्यावी असेही आयुक्तांनी सांगितले. नालेसफाईसाठी आपल्या हातात मर्यादित कालावधी उपलब्ध आहे. त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सफाईचे काम करावे लागेल. वॉर्ड स्तरावर नाले सफाईच्या कामाचा दैंनदिन अहवाल तपासला जाणार आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्यावेळी पावसाळी गटारेही तपासली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले. नाले सफाई करताना तरंगणारा कचरा उचलला गेल्यावर, मध्येच उगवलेली झुडपे, मोठा दगड, इतर कचरा काढावा. पोलकेल मशीनच्या मदतीने जे नाले साफ केले जात आहेत तेथे तळापासून सफाई झाली पाहिजे. २४ ते ४८ तासांच्या आत बाहेर काढलेला गाळ उचलला गेला पाहिजे. मशीन नाल्यात उतरवण्यासाठी नाल्याची भिंत तोडली असेल तर ती पूर्ववत केली जावी. गोणी रचून तात्पुरती व्यवस्था नको, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. नाल्यांची तोंडे ज्या ठिकाणी खाडीत उघडतात ते भागही स्वच्छ केले जावेत. तेथे कचरा साचणार नाही आणि पाण्याचा जलद निचरा होईल याची काळजी घ्यावी. रस्त्यावरून दिसणारा नाला साफ केला आणि जो सहज दिसत नाही तो भाग तसाच ठेवला तर कारवाई केली जाईल, असा इशारा ही आयुक्तांनी दिला. नाले किंवा गटार साफ नसल्याने पाणी साचले तर कंत्राटदाराला प्रती घटना २० हजार रुपये दंड केला जाणार आहे, हेही आयुक्तांनी अधोरेखित केले. गेल्या काही दिवसात नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया यातून आलेल्या नाले सफाई बद्दलच्या तक्रारी, सूचना, उपाय आदी आयुक्तांनी विभागवार वाचून दाखवल्या. तसेच, त्यावर उपाय योजून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. काही नाल्यातून वीज वाहिन्या गेलेल्या असतील, तिथे काम करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या उपस्थिती नाले सफाई करावी. कामगारांना धोका पत्करायला लावू नये, असे आयुक्तांनी सांगितले. सकारात्मक पद्धतीने, काटेकोरपणे आणि युद्ध पातळीवर नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. ते आपण एक टीम म्हणून एकत्रितपणे पूर्ण करू असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. नाले सफाईची कामे सध्या सुरू आहेत. ती झाल्यावर त्या नाल्यात पुन्हा कचरा टाकला जातो असाही एक अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या नाल्यात कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी, घरातील अनावश्यक सामान, कचरा नाल्यात टाकला जातो, पाण्यासोबत तोही वाहून जाईल असे नागरिकांना वाटते. पण हा कचरा साठून राहतो हे लक्षात घेवून नागरिकांनी सहकार्य करावे. कचरा उचलण्यासाठी गाडीच्या जास्तीच्या फेऱ्या हव्या असतील तर तशी व्यवस्था करता येईल. ठराविक प्रकारचा कचरा एखादा दिवस ठरवून परिसरातून उचलला जाईल असेही पाहता येईल. त्याबद्दल पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद वाढवावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading