ठाणे महापालिकेची १०० कोटींची भरारी – मालमत्ता कराचा विक्रमी भरणा

मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ कायम ठेवत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात १०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने चालू आर्थिक वर्षाची देयके १ एप्रिलपासून करदात्यांना पाठविण्यास सुरूवात केली. मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या या संदेशाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी सुमारे १००० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी १० मेपर्यंत ११ कोटी रुपयांचा कर भरणा झाला होता. या वर्षी ही रक्कम १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा पट वाढ झाली आहे. तोच कल मालमत्ताधारकांच्या संख्येबाबतही आहे. गेल्या वर्षी या काळापर्यंत ६ हजार ४१५ मालमत्ताधारकांनी कर भरला होता. ती संख्या यावेळी ७४ हजार ९०८ एवढी आहे. करदात्यांपैकी ५१ टक्के नागरिकांनी कर भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे. तर ३३ टक्के करदात्यांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला आहे. रोख रकमेने कर भरणा करण्याचे प्रमाण आता साडेआठ टक्क्यांवर आले आहे. तसेच सर्वाधिक ३६ कोटी रुपयांचा कर भरणा माजीवडा –मानपाडा क्षेत्रात झाला आहे. तर सर्वात कमी अडीच कोटी रुपयांचा कर भरणा मुंब्रा भागात आहे. ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच ऑनलाईन कर भरणारे आणि ऑफलाईन कर भरणा करणारे यांच्याकडून प्रक्रियेबद्दलचा प्रतिसाद नोंदवून घ्यावा म्हणजे आपल्या यंत्रणेत तसे बदल करता येतील अशा सूचना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांना दिल्या आहेत. पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जूनपर्यंत १० टक्के, ३० जूनपर्यंत ४ टक्के, ३१ जुलैपर्यंत ३ टक्के आणि ३१ ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत माजीवडा – मानपाडा प्रभाग समितीत ३६ टक्के कर भरणा झाला असून वर्तकनगर – २५, नौपाडा-कोपरी – ११ टक्के, उथळसर – ९ , लोकमान्य नगर-सावरकर नगर – ४ कळवा – ३ टक्के, दिवा – साडेतीन, वागळे इस्टेट – ३ टक्के, मुंब्रा – अडीच टक्के तर मुख्यालयामध्ये ३ टक्के कर भरणा झाला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading