नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीला कात्री न लावण्याची नगरसेवक नारायण पवारांची मागणी

शहरातील आवश्यक आणि तात्काळ गरजेची विकासकामं करण्यासाठी नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीला कात्री लावू नये अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. या दोन्ही निधींसाठी १७६ कोटींची तरतूद आवश्यक असल्यामुळं महापालिकेनं कपात न करण्याबरोबरच संबंधित कामांचा फिल्ड वर्कमध्ये समावेश करू नये अशीही मागणी नारायण पवार यांनी केली आहे. प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीतील कामं निधीच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. सर्वच प्रभागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे. प्रभागातील रस्ते, पायवाटा, पदपथ, गटारांची दुरावस्था झाली आहे. पदपथांवरील चेंबर्स तुटल्यामुळं अपघातांची भीती आहे. त्यातच मार्च महिन्यापासून विकासकामं बंद असल्यानं रस्ते, गटारं, पायवाटा, पदपथ आदींच्या दुरूस्तीची गरज आहे याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधलं आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी महापालिकेकडून मोठ्या खर्चाची कामं हाती घेतली जात आहेत. मात्र नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीवर चालवण्यात येणारी कात्री अन्यायकारक असल्याचं नारायण पवार यांचं म्हणणं आहे. महापालिकेनं निधीमध्ये कपात केल्यास निधी अपुरा पडण्याबरोबरच कामंही रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्थायी समितीनं मंजूर केलेला नगरसेवक निधी प्रदान करावा अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading