धर्मवीर आनंद दिघे हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण – आनंद परांजपे

धर्मवीर आनंद दिघे हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार शिंदे गटाला नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. तर, शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता हेच आहे. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱया बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे नरेश म्हस्के यांना आपण थेट सवाल करीत आहोत की, धर्मकार्य करताना जे नैतीक अधिष्ठान अंगी असावे लागते, ते आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्यांचे नरेश म्हस्के यांच्या अंगी आहे का? क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी आपल्या निष्ठेचा शर्ट उतरवला होता. त्यांची आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी आहे का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेना- शिंदे गटावर पलटवार केला. जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानाचा आधार घेत शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेचा जुने दाखले देत आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. गेले दोन दिवस शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी कालची पत्रकार परिषद ऐकत असताना, धर्मवीर आनंद दिघे यांना शरद पवार यांनी टाडा लावला का? जामीन देताना शरद पवार हे न्यायाधीश होते का? असे सवाल उपस्थित करुन पुन्हा एकदा आपली बौद्धीक दळीद्रीपणाचे दर्शन जगाला घडविले आहे. या निमित्ताने एकच सांगायचे आहे की, शरद पवार हे 1967 पासून सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी व्यक्तीगत जीवनामध्ये अनेकांना मदत केलेली आहे. मात्र, त्यांनी ती कधीच कोणाला दाखवून त्याचे सार्वजनिक वक्तव्यं केले नाही. त्यामुळे 1988-89 साली ज्या काही घटना घडल्या. त्याबाबत वक्तव्ये करताना नरेश म्हस्के यांनी तारतम्य बाळगायला हवे. आनंद दिघे यांचे जीवनकाल पाहिला तर त्यांनी आपल्या जीवनात त्याग, समर्पण आणि निष्ठा यांस त्यांनी अनन्यसाधारण महत्व दिले होते. त्यांनी आपली निष्ठा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वाहिली होती. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱया बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत आहे असे परांजपे म्हणाले.
हास्यास्पद बाब अशी आहे की, फोन करुन जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्याचे निरोप दिले जात आहेत. उल्हासनगरची कालची पत्रकार परिषद आपण ओझरत्या स्वरुपात ऐकली. अरुण आशान यांची विधाने ऐकून हसू आले. अरुण आशान हे कधी तरी आनंद दिघे यांच्या सान्निध्यात आले होते का? डोंबिवलीत राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या शेजारी रवींद्र पाटील, राजेश कदम बसले होते. हे पाहून इतिहासाची पाने आम्ही उजळवायची का? श्रीधर म्हात्रेंचा जेव्हा खून झाला; रमेश सुकऱया म्हात्रेंवर जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी राजेश मोरे कुठे होतात आणि कुठल्या पक्षात होतात? रवींद्र पाटील यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. राजेश कदम हे किती पक्ष बदलून आले. ही , इतिहासाची पाने बाहेर काढणास प्रवृत्त करु नका. कारण, त्या क्षणांचा आपणही साक्षीदार आहोत. हे सर्व घडत असताना आपले वडील प्रकाश परांजपे हे महापौरपदाचे उमेदवार होते. एक मताने त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशावरुन ठाणे पालिकेच्या 33 नगरसेवकांनी राजीनामे देऊन तीन वर्षे शिवसेना सत्तेच्या बाहेर बसली. हे धारिष्ट आताचे मुख्यमंत्री दाखवतील का? वारंवार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांना राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देत आहेत. लोकांसमोर जाऊन जनमत घेण्याबाबतही सूचवित आहेत. याबाबत मुख्यमंत्री आव्हान स्वीकारणार आहेत का? त्यामुळे नरेश म्हस्के यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. जितेंद्र आव्हाड हे गेले 35 वर्षे एकाच नेत्याच्या मागे त्यांचे बोट धरुन चालत आहेत; ज्यांचे नाव आहे शरद पवार! त्यामुळे एका बाजूला आनंद दिघे जे अनेकांसाठी दैवत आहेत. दुसऱया बाजूला तुम्ही राक्षसी महत्वकांक्षेपोटी शिवसेना पक्ष फोडला; चिन्ह चोरले; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे म्हस्के यांना बोलण्याचा कुठलाही नैतीक अधिकार नाही. म्हणूनच शरद पवार यांच्याबद्दल बोलताना तारतम्य पाळा. म्हणूनच इतिहासाची उजळणी करायला लावू नका. आनंद दिघे असताना म्हस्के यांना स्वीकृत नगरसेवकही केले नाहीत. आपण भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होतात. पण आपल्याला उमेदवारीही दिली नाही. 2002 मध्ये म्हस्के हे स्वीकृत नगरसेवक झाले आणि 2012 मध्ये लोकांमधून निवडून आले. राष्ट्रवादीबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भान बाळगा, असा मित्रत्वाचा सल्ला आपण त्यांना देत आहोत असेही परांजपे यांनी सांगितले. 2017 मध्ये भिवंडी महापालिकेची निवडणूक झाली. काँग्रेसचे 47 नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर झाले होते. त्यावेळी जिल्हाप्रमुख असलेले आणि निर्णय घेण्याचे अधिकार असलेले एकनाथ शिंदे यांनी मनोज काटेकर यांना का उपमहापौर केले? जावेद दळवी यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना का बसवले? अंबरनाथला मनिषाताई वाळेकर या नगराध्यक्ष झाल्या. त्यावेळी भाजपला बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. त्या बदल्यात राष्ट्रवादीला सभागृह नेतेपद दिले. अरुण आशान यांच्या मातोश्री लिलाताई आशान या 2019 ला महापौर होत असताना राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. विशष म्हणजे, त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलेले नव्हते. अनेक ठिकाणी मांडीला मांडी लावून बसलेले चालते का? ठाण्यातही अनेक नगरसेवकांना फोडून जवळ घेतले ना! अगदी काँग्रेसचे यासीन कुरेशी यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांचा पाठिंबा घेतलात. त्यामुळे सत्तेसाठी तुम्ही मांडीला मांडी लावून बसत होतात, हे उघड आहे. सत्ता हेच तुमचे सर्वस्व आहे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी संघटन हे सर्वस्व होते. त्यांच्यासाठी शिवसेनाप्रमुख हे सर्वस्व होते. त्यामुळे फार मोठ्या गप्पा मारु नका, असे आनंद परांजपे म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading