धर्मवीर आनंद दिघे महिला स्वाधार केंद्राची स्थापना

आनंद दिघे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ठाण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जुन्या महिला कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या नावाने ‘धर्मवीर आनंद दिघे स्वाधार केंद्र’ सुरू केले आहे.माजी महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली हे संघटन केवळ महिलांच्या प्रगतीसाठी काम करणार आहे. एकेकाळी शिवसेनेची महिला आघाडी ही या संघटनेची कणा असायची. निवडणूक, मोर्चे, आंदोलने आणि रस्त्यावरील राड्यांसाठी ही महिला ब्रिगेड पुरुषांच्या पुढे आघाडीवर असायची. ठाण्यातील महिला आघाडी तर उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जुन्याजाणत्या कार्यकर्त्या विजनवासात गेल्या होत्या. आज या जुन्या महिला आघाडीतील महिलां साठीत आल्या आहेत, काहींनी साठी पार केली आहे. अनेक वर्ष समाजात काम केल्यानंतर आता त्यांना घरी बसल्यानंतर घर खायला उठतं. अनेकजणी घरी बसल्याने मानसिक, शारीरिक व्याधींनी बेजार आहेत. या सगळ्याची माहिती अनिता बिर्जे यांना समजताच त्यांनी पुन्हा एकदा घराबाहेर पडण्याचे ठरविले आहे. आपल्या सगळ्या जुन्या सहकऱ्यांना घेऊन त्यांनी आनंद दिघे यांच्या नावाने केवळ महिलांच्या उद्धारासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे स्वाधार केंद्राची स्थापना दिघे यांच्या जयंतीनिमित्त केली, यावेळी महिलांनी गर्दी केली होती. आज जरी आम्ही हे स्वाधार केंद्र सुरू करीत असलो तरी याद्वारे आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. हे केंद्र केवळ महिलांच्या उत्थानासाठी आहे. आमचे आजही रक्त भगवे असून मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत असं अनिता बिर्जे यांनी यावेळी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading