देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित न केल्याने सामुहिक विकास योजनेच्या भूमीपूजनावर भारतीय जनता पक्षाचा इशारा

सामुहिक विकास योजना प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका बजाविलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलाविल्याच्या निषेधार्थ भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. एकेकाळी सामुहिक विकास योजनेला मंजुरी दिल्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आभाराचे बॅनर लावले होते. मात्र, आता भूमिपूजन कार्यक्रमाचे फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा सवाल निरंजन डावखरे यांनी केला होता. त्याचबरोबर आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही क्लस्टर उद्घाटनाची लगीनघाई का, असा सवालही केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर सोमवारी दुपारनंतर शिवसेना नेत्यांनी मंत्रालय व पालिकेत धावपळ करुन क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला मंजूरी मिळविली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाचे काम आवश्यक परवानगी घेऊनच करण्याचा आमचा मुद्दा होता. तो मान्य करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.शहरातील हजारो नागरिकांच्या हितासाठी क्लस्टर प्रकल्प हा अत्यावश्यक व गरजेचा आहे. या प्रकल्पाला भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातून गावठाणे व कोळीवाडे वगळण्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाचे पारदर्शकपणे काम पूर्ण होण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करु, अशी ग्वाही निरंजन डावखरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस हे क्लस्टरचे भाग्यविधाते आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेने सन्मानाने बोलवायला हवे होते. मात्र, त्यांना निमंत्रित न केल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकाराचा निषेध करुन भाजपने भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवकांबरोबरच कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत, असे डावखरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading