दिवा परिसरात सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

दिवा विभागात सुरू असलेल्या विविध कामांबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापौर आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला आणि त्यानंतर महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दिवा विभागात सुरू असलेली कामे ही जलदगतीने पूर्ण करण्यात यावी आणि दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीमध्ये दिवा विभागातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिवा-शिळ रोड, दिवा-आगासन रोड, दिवा बायपास, दातिवली उसरघर रस्ता, साबे रोड, रेल्वे ओव्हर ब्रीज आदी रस्त्यांची कामे जलदगतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश बैठकीदरम्यान देण्यात आले. तसेच दिवा विभागातील खिडकाळी प्राचीन मंदिर परिसरातील सुशोभिकरणासाठी डीपीआर तयार करणे, नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे काम करणे, सुविधा भूखंडावर आगरी कोळी भवन सभागृह उभारणे, मेट्रो जोड रस्त्याची कामे प्रस्तावित करणे, विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या पाईपलाईनचे काम करणे, दिवा-मुंब्रा रस्त्याचा डी.पी. आर तयार करणे, बांधून तयार असलेले जलकुंभ कार्यान्वित करणे तसेच अस्तित्वातील डंपिंग ग्राऊंडला पर्यायी जागा शोधून याबाबत तातडीने निर्णय घेणे आदी कामांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. दिवा विभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading