दारू पिऊन शिवीगाळ करणा-या बहिणीच्या नव-याची हत्या करणा-यास अवघ्या दोन तासात अटक

दारु पिऊन सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याची रागाच्या भरात तरुणाने राहत्या घरात धारदार चाकुने हत्या केली. या घटनेनंतर तरुण तमीळनाडूतील आपल्या मूळ गावी पळण्याच्या प्रयत्नात असताना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानकाजवळ दोन तासात अटक केली. मारिकन्नी तेवर असे मृत व्यक्तिचे नाव असून तो इडली विक्रेता होता. त्याला दारुचे व्यसन होते. मारिकन्नी कुटुंबासह खंबाळपाडा भागात राहत होता. मारिकन्नी दारू पिऊन घरी आला आणि सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरात बहिणीचा भाऊ रमेश वेलचामी उपस्थित होता. त्याने मारिकन्नी यांना सुरुवातीला शांत राहण्यास सांगितले. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवीगाळ करण्यावरुन मारीकन्नी आणि रमेश यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात रमेशने घरातील चाकुच्या साहाय्याने मारिकन्नीवर वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश घरातून पळून गेला.
टिळकनगर पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल होताच, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी तपास पथके तयार करुन तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गु्न्हे शाखेचे उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार गुरुनाथ जरग, प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव यांचे साध्या वेशातील पथक तैनात होते. त्यांच्याजवळ रमेशचे छायाचित्र होते. एक तरुण कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर चेन्नई एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. तो रमेश असल्याचा अंदाज करुन पोलिसांनी त्याला हटकले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याची कसून चौकशी करताच त्याच्याजवळ तमीळनाडू प्रवासाचे तात्काळचे तिकीट होते. तो आरोपी रमेश असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading