त्रासदायक दुभाजक हटवणार; वाहतुकीला दिशा मिळणार

गेले काही दिवसांत शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुभाजक बसवण्यात आले आहेत. जे दुभाजक स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासदायक ठरत आहेत, ते हटवण्यावबाबत महापालिका मुख्यालयात चर्चा करण्यात आली तर पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या जागी वाहन तळास मान्यता देण्यात आली आहे.

गेले अनेक दिवस शहरांतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध बदल महापालिका आणि वाहतूक शाखेकडून होत आहेत. त्यानुसार काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. काही दुभाजकांना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोधही केला आहे. हे दुभाजक आणि वाहनतळे याबाबत आज आमदार संजय केळकर यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त अभिजित बांगर आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. वाहतूक बदल करत असताना नागरिकांना त्रासदायक बदल करण्यात येऊ नयेत, अशी भूमिका केळकर यांनी घेतली. वादग्रस्त ठरलेला आराधना सिनेमागृहाजवळील दुभाजक हटवण्यात आला असून गोखले मार्गावरील दुभाजक आणि इतर त्रासदायक दुभाजक हटवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. माजिवडे नाका येथील अनेक गृहसंकुलांच्या वाहतुकीसंदर्भातील तक्रारी असून त्यावरही तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.गावदेवी वाहनतळाकडे जाताना रिक्षाचालकांच्या अडथळ्याचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांना चालणेही जिकिरीचे होते. येथील मुजोर रिक्षाचालकांचाही बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.मॉडेला ट्रक टर्मिनस संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. याबाबत कायदेशीर लढा सुरू असून त्याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर ट्रक टर्मिनस सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. काही वाहनतळांवर अतिक्रमणे झाली असून ती दूर करावीत, शाहू मार्केटची वाहनतळासह पुनर्बांधणी करण्याबाबत लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचेही केळकर यांनी पत्रकारांना सांगितले. जोपर्यंत वाहनतळ पुरेशा प्रमाणात होणार नाहीत तोपर्यंत रस्त्यांवर वाहने उभी राहतील, परिणामी वाहतूक कोंडी होईल. ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्किंग प्लाझा येथे वाहनतळाचीच निर्मिती करण्यात यावी, या मागणीला आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. यामुळे येथील सेवा रस्त्यावर होणारी मोठी कोंडी सुटणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading