घोडबंदर रस्त्यावरील ब्रह्मांड संकुलाजवळ असलेल्या तुर्फेपाडा तलावानं कात टाकली असून आता तलावाभोवती वेगानं उभारण्यात येणा-या गॅबियन पध्दतीच्या बंधा-यामुळे तलावात मोठा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. काही वर्षापासून तुर्फेपाडा तलावाला बकाल स्वरूप प्राप्त झालं होतं. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन या तलावाची स्वच्छता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेनं तुर्फेपाडा तलावाची सफाई केली आणि त्याच्या सुशोभिकरणास सुरूवात केली. सुशोभिकरणाबरोबरच तलावात पाण्याचा मोठा साठा झाल्यास परिसरातील बोअरिंगला बारा महिने पाणी मिळू शकेल हे लक्षात आल्यावर नगरसेवक डुंबरे यांनी महापालिकेकडे तलावाभोवती गॅबियन पध्दतीचा बंधारा बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. डुंबरे यांच्या मागणीनुसार पालिका आयुक्तांनी या कामास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता बंधा-याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या बंधा-यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तुर्फेपाडा परिसरात पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे. महापालिका अधिका-यांसमवेत मनोहर डुंबरे यांनी या कामाची पाहणी केली.