तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास पालिका मुख्यालयात कचरा टाकण्याचा मनसेचा इशारा

ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईत हातसफाई सुरु असल्याने याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी कापूरबावडी येथील नाल्यात उतरून आंदोलन छेडले. तसेच ३१ मे ची डेडलाईन उलटुन गेली असुन आता येत्या तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास कचरा पालिका मुख्यालयात आणुन टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. आज शहरातील विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी आंदोलने केली. महापालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त नाल्यांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यामागुन दौरे करीत आहेत.महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी ३१ मे पर्यंत ठाणे शहरातील संपूर्ण नाले सफाई पूर्ण होईल. असा दावा केला असताना आता २ जून उलटला तरी नालेसफाई कागदावरच झालेली दिसत आहे. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने ठाण्यातील कापूरवाडी येथील नाल्यात उतरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. शहरातील कापुरबावडी नाला, वृदावन आनंद पार्क, कोलशेत रोड अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महापालिकेकडून केलेली सफाई ही फक्त अधिकाऱ्यांना दिखाव्या पुरती असून ठेकेदाराने नालेसफाई पुन्हा करावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नाले व्यवस्थित साफ न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबण्याची चिन्हे आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास पावसाचे पाणी नाल्याच्या बाहेर येऊन येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागतात. नालेसफाई होऊन सुद्धा कापूरबावडी पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तेव्हा, हा कचरा येत्या तीन दिवसात हटवुन नालेसफाई पूर्ण न केल्यास सगळा कचरा पालिका आयुक्तांच्या दालनासमोर आणि महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल. असा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading