तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण

ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या एका मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पालिका आयुक्तांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाबद्दल सादरीकरण केले. तसेच उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती दिली. तिसऱ्या खाडी पुलाचे लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच पुढील मार्गिका एक डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणाही केली. तसंच या पुलाचा विस्तार पटनीपर्यंत करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही स्पष्ट केले. तीन हात नाका, माजीवडा जंक्शन येथेही लवकरच काम सुरू होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलावरून प्रवास केला आणि ही मार्गिका तत्काळ लोकांसाठी खुली करण्यात आली. ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून ठाणे- बेलापूर मार्गे नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा खाडीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पूलाचे 93% काम पूर्ण झाले आहे. परंतु, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पूलाच्या पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा चौक- बेलापूर रोड ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात येत आहे. कळवा खाडीवर एकूण तीन पूल आहेत. पहिला पूल ब्रिटिशकालीन असून तो 1863 मध्ये बांधला होता. 2010 मध्ये त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली. ऑगस्ट 2016 मध्ये हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला. तो आता वास्तू वारसा आहे. १९९५-९६ दरम्यान दुसरा कळवा खाडी पूल बांधण्यात आला. त्यावरूनच आतापर्यंत सर्व वाहतूक सुरू होती. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दोन्हीकडील चौकात वाहतूक कोंडी होत होती. म्हणून हा तिसरा पूल बांधण्यात आला आहे.
तिसरा पूल २०१३ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या महासभेने 20 फेब्रुवारी 2014 रोजी त्यास मान्यता दिली. लगेच कार्यादेश देऊन काम सुरू करण्यात आले. नवीन पूलाची एकूण लांबी 2.20 कि.मी. असून पूलाकरिता एकूण 5 मार्गिका बांधण्यात आलेल्या आहेत. या पूलाचा एकूण प्रकल्प खर्च 183.66 कोटी इतका आहे. ठाणे कारागृहाजवळील मार्गिका डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूकीस खुली करण्यात तयार होईल. उर्वरित साकेत कडील मार्गिका माहे मार्च 2023 पर्यंत वाहतूकीस पूर्ण तयार होऊन संपूर्ण पूल वाहतूकीस उपलब्ध होईल. संपूर्ण पूल मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर कळवा, मुंब्रा आणि बेलापूर कडे जाणारी संपूर्ण वाहतूक पूलावरुन एकेरी मार्गाने जाईल आणि बेलापूर रोड कळवा, मुंब्रा कडून ठाणे शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे सध्या वापरात असलेल्या पूलावरुन एकेरी मार्गाने असेल. हा पूल पूर्ण क्षमतेने मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची संपूर्ण समस्या दूर होणार आहे. पूलावर येण्यासाठी पोलीस कमिशनर ऑफिस मार्गिका, जेल जवळील मार्गिका आणि साकेत कडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार मार्गिका अशा तीन मार्गिका आहेत. पूलावरुन उतरण्यासाठी कळवा चौक आणि बेलापूर रोड अशा दोन मार्गिका आहेत. पूलावर ठाणे आणि कळवा दरम्यान शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पादचारी मार्गिकेची सुध्दा व्यवस्था असणार आहे. खाडीवरील पूलाची लांबी 300 मी.मी. असून त्यापैकी 100 मी. लांबीचा बास्केट हॅण्डल आकाराचा लोखंडी नेव्हीगेशन स्पॅन आहे. त्याला स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे स्पॅनच्या संरचनेच्या स्थितीबाबत दररोज मूल्यमापन होऊ शकेल. नेव्हीगेशन स्पॅनला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून यामुळे पुलाच्या तसेच एकूणच शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading