उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी ठरेल फायदेशीर – मुख्यमंत्री

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वरील वाय जंक्शन येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारीकरण करण्याचे काम देखील लवकर सुरू होईल ज्यामुळे या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळतील तसेच इतर विकास कामामुळे आयुष्य सुखकर होईल.
महानगर आयुक्त श्रीनिवास म्हणाले, या प्रकल्पामुळे लाखो लोकांना फायदा होईल. यामुळे मनुष्याचे तास कमी होतील, रहदारी कमी होईल, जेएनपीटी आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. मुंब्रा वाय जंक्शन प्रकल्पाने बाधित झालेल्या एकूण ८८६ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा जिल्ह्याच्या शहरी भागातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा – कल्याण फाटा जंक्शन या भागातून जात असल्यामुळे त्या भागाचा विकास होत आहे. मुंब्रा वाय जंक्शनवरील एमएमआरडीएने बांधलेल्या ३+३ अशा दुहेरी मार्गिकेच्या या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विभक्त करते. त्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणार्‍या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरेल. तसेच मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दीदेखील टळेल. शिळफाटा, डोंबिवली/ कल्याण या भागांमधील विकासकामांमुळे निवासी संकुलामध्ये नागरी वाढ लक्षात घेता हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. या प्रकल्पामध्ये रस्ता रुंदीकरणासह उड्डाणपूलाच्या बांधकामाचा अंतर्भाव आहे. या उड्डाणपुलाची एकूण लांबी पोहाचमार्गासह ८२० मी. असून रुंदी २४.२० मीटर इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading