डोंबिवलीमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात पासपोर्ट सेवा केंद्र

डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. सुरूवातीला जागेची अडचण होती. जागेची अडचण सोडवल्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला. त्यासाठी शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्यावेळी डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी दिरंगाई न करता लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे त्यांनी आश्वासित केले. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याचे संचार राज्य मंत्रालयाकडून शिंदे यांना सूचित करण्यात आले आहे. ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे आता डोंबिवली एम.आय.डी.सी. पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading