डीजीटल बोर्ड तसंच अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेच्या कामास राज्य शासनाची मंजुरी

मुंबईत जशा पद्धतीने विकास होत आहे त्याच सर्व आधुनिक पद्धतीने ठाणे शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक आग्रही आहेत. त्यामुळे ठाण्यातील सर्व चौकांचे सुशोभीकरण करावे, शहरात मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लावली जावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार घोडबंदर रोडवरील महत्वाच्या सर्व चौकांचे नियोजनबद्ध पद्धतीने सुशोभीकरण केले जाणार असून त्याचवेळी आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी ‘डिजिटल बोर्ड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या-त्या प्रभागाची माहिती दर्शविणारे फलक म्हणजेच ‘डिजिटल बोर्ड’ लावण्यासाठी तसेच अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करताना त्यासाठीचा राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील महत्वाच्या चौकांचा चेहरा-मोहरा बदलेल अशा पद्धतीने चौकांचे सुशोभीकरण केले जाणार असून त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे, यामुळे एकूणच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सरनाईक यांच्या संकल्पनेतून आधी काही चौकांचे आणि परिसराचे सुशोभीकरण झाले आहे. आता नव्याने काही चौकांचा पहिल्या टप्प्यात सुशोभीकरण करून विकास केला जाणार आहे. चौक सुशोभित करताना त्या-त्या परिसराची संस्कृती दर्शविणारे किंवा महत्व दाखविणारे वास्तुशिल्प त्या सुशोभित चौकात बसवले जाणार आहे. एखाद्या भागात आगरी-कोळी-आदिवासी यांच्याशी संबंधित शिल्प किंवा त्या-त्या परिसराचे महत्व पाहून, ज्यांचे तिथे योगदान आहे किंवा त्या परिसराची ओळख दर्शवली जाईल असे कलात्मक वास्तूशिल्प बसवून सुशोभीकरण डिजाईन केले जाईल. त्याचवेळी प्रभागांमध्ये जेव्हा लोक एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधतात तेव्हा त्यांना माहिती कळावी म्हणून डिजिटल बोर्ड चौकांमध्ये लावण्यात येणार आहेत. प्रभागात नाक्यांवर किंवा महत्वाच्या ठिकाणी हे डिजीटल बोर्ड २४ तास सुरु राहतील. डिजिटल बोर्डच्या स्क्रीनवर त्या प्रभागातील रस्ते, हौसिंग सोसायट्या, शाळा, कॉलेज, जवळचे पोलीस स्टेशन किंवा एकूणच प्रभागातील महत्वाची माहिती डिजीटल बोर्डवर झळकत राहील. मोठमोठ्या महानगरात असे डिजिटल बोर्ड, चौकांचे सुशोभीकरण झाले आहे, त्याचप्रमाणे आता ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील चौक सुशोभीकरण व डिजिटल बोर्ड लावले जाणार असून त्यासाठी २० कोटी अंदाजित निधी लागणार आहे. त्यातील ५ कोटी राज्य सरकारने मंजूर केल्याने याच वर्षात या कामांना सुरुवात होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्ये प्रमाणेच वाहन संख्याही वाढत आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सध्या आहे तर काही ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा बसविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरातील सर्व सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची आमदार सरनाईक यांची मागणी मान्य झाली आहे. मुंबईत वरळी सी लिंक किंवा इतर काही भागात जी आधुनिक सिग्नल यंत्रणा आहे त्याप्रमाणे ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लावली जाणार आहे आणि त्यासाठीही निधी मंजूर झाला आहे. टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा आधुनिक केली जाईल, अद्ययावत केली जाईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading