ठेकेदाराकडून अतिक्रमित उद्यान नागरिकांसाठी होणार खुले

माजीवड्यातील उद्यान ठेकेदाराकडून अतिक्रमित केल्याची माहितीच सहायक आयुक्तांना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. माजीवड्यात ठाणे महापालिकेचे उद्यान आहे. उद्यान दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येऊन तिसऱ्या बाजूची भिंत तोडण्याचा आणि ते अतिक्रमित करण्याचा ठेकेदाराचा डाव स्पष्ट झाल्याने स्थानिकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास ही बाब आणली. नागरिकांनी या उद्यानात प्रवेश केल्यानंतर त्यांना विरोधही झाला. अखेर केळकर यांनी प्रभाग समिती आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांना या उद्यानाबाबत आणि त्यातील अतिक्रमणाबाबत माहितीच नसल्याचे पुढे आले. किमान सहायक आयुक्तांना याची माहिती असणे गरजेचे होते. मात्र या प्रकारानंतर प्रशासनातील सावळा गोंधळ पुढे आल्याचे केळकर यांनी सांगितले. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत आमदार केळकर यांनी उद्यानातील अतिक्रमणाबाबत आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई करून उद्यान खुले करावे अशी मागणी केळकर यांनी केली. अशा पद्धतीने प्रशासनाची भूमिका राहिली तर अनेक उद्याने आणि भूखंड हातातून जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत उद्यान नागरिकांसाठीच राहणार असल्याचे सांगून अधिकाऱ्यांना तशा सूचनाही केल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारींवर काम करत असून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अनधिकृत बांधकामांप्रकरणी संबंधित बिल्डरमंडळी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. ही कारवाई होत असताना संबंधित सहायक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. भिवंडीत अशा प्रकरणांमध्ये उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात आले, मग अशी कारवाई ठाण्यात का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading