ठाण्यातील वंदना आणि भिवंडी एसटी स्टँडचं विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतर

ठाण्यातील वंदना आणि भिवंडी येथील एसटी स्टँड विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतरीत केले जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील एसटी स्थानकांचे विमानतळाच्या धर्तीवर रूपांतर करण्याबाबत दिरंगाई होत असल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. विमानतळाच्या धर्तीवर प्रमुख १३ शहरांमधील एसटी स्टँड अत्याधुनिक बसतळात रूपांतरीत करण्याचा निर्णय २३ जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला होता. यामध्ये ठाण्यातील वंदना आणि भिवंडी एसटी स्टँडचा समावेश होता. संबंधित प्रकल्पांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र मालमत्ता क्षेत्रातील मंदीमुळं संबंधित प्रकल्पांना विकासकांचा अल्प प्रतिसाद मिळाला असं परब यांनी सांगितलं. विमानतळा प्रमाणेच एसटी थांब्यावर सर्व सुविधा दिल्या जातील, प्रवाशांसाठी प्रशस्त लॉबी, आधुनिक पध्दतीची आसन व्यवस्था, वातानुकुलित बसच्या प्रवाशांसाठी वातानुकुलित विश्रामगृहं अशा विविध सोयीसुविधांचा यात समावेश असल्याचं अनिल परब यांनी या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading