ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत लसीकरण करण्याची नारायण पवारांची मागणी

ठाण्यातील सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत कोरोना लसीकरण करावे अशी आग्रही मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांच्या आरोग्य संरक्षणाची जबाबदारी महापालिकेचीच आहे असे त्यांनी नमूद केलं.
ठाणे महापालिकेने खासगी कार्यालये आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीमेसाठी धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्यात सशुल्क लसीकरणाची अट टाकण्यात आली आहे. या सशुल्क लसीकरणाला पवार यांनी विरोध दर्शविला आहे. कोरोना आपत्तीमुळे वर्षभरापासून सामान्य नागरिकांचे संसार कोलमडले आहेत. तर अनेकांचा रोजगार हिरावला असून, हजारो नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली. अशा परिस्थितीत ठाणे महापालिकेने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे एका कुटुंबात चार ते पाच जणांचा समावेश असतो. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी किमान तीन ते चार हजारांचा खर्च परवडणारा नाही. लसीकरण न झाल्यास कोरोनाने जीव गमाविण्याची भीती, तर सशुल्क लसीकरण परवडणारे नाही अशा कात्रीत सामान्य ठाणेकर अडकण्याची भीती आहे याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना आपत्तीसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. केवळ क्वारंटाईन शिबिरातील साहित्यासाठी जम्बो खरेदी केली. तर कोरोना हॉस्पिटल आणि क्वारंटाईन शिबिरातील जेवणासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा खर्च करण्याची योजना आहे. त्याआधी वर्षभरात सुमारे ६ कोटी रुपये केवळ भोजनासाठी खर्च झाले. ठाणे महापालिकेने आतापर्यंत १५ लाखांहून अॅंटीजन टेस्ट मोफत केल्या आहेत. तसेच आरोग्य योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने मोफत लसीकरण गरजेचे आहे. अशा परिस्थितीत महापालिकेनेच पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या सहकार्याने मोफत लस द्यावी. त्यासाठी ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत लसीकरण शिबिरे घ्यावीत, अशी मागणी नारायण पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading