ठाण्यातील कोणती शाळा चांगली यावरून रंगला जिल्हाधिकारी आणि महापौरांमध्ये वाद

शालांत परीक्षेची गुणवत्ता यादी आता येत नसल्यामुळे शाळा-शाळांमधली स्पर्धा संपली आहे. मात्र आज डॉ. बेडेकर विद्यामंदिर चांगली की सरस्वती विद्यामंदिर चांगली यावरून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यात वाद रंगला. निमित्त होतं ठाण्यातील माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू होण्याचं. आजपासून ठाण्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात उत्साहाचं वातावरण होतं. सरस्वती विद्या मंदिरच्या नुतनीकृत वास्तूचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी आणि महापौरांमध्ये हा वाद रंगला होता. सरस्वती मंदीर ट्रस्टच्या शाळेची घंटा तब्बल पावणे दोन वर्षांनी वाजली. दुसऱ्या मजल्यावरच्या दहावी ब च्या वर्गात शिक्षक आले. विद्यार्थ्यांनी त्यांना एका स्वरात नमस्ते केले. वर्गावर आलेल्या शिक्षकांनी त्यांची ओळख करून दिली. नमस्कार मी राजेश नार्वेकर आज तुम्हाला स्त्री शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे यांच्यावरील कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविणार आहे आणि पुढील किमान पाऊण तास जिल्हाधिका-यांनी शिक्षकाची भूमिका वठवली. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. शिक्षकांकडून होणारे संस्कार प्रत्यक्ष शाळेत आल्यावर मिळतात. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यात. मित्र-मैत्रिणी पुन्हा प्रत्यक्ष भेटतील. पालकांनी तुम्हाला शाळेत पाठवलं आहे तुम्ही सुदृढ राहीलात तर त्यांच्या मनात भिती राहणार नाही आणि समाजापुढेही मोठा संदेश जाईल.यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले. शाळेत आज वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेची घंटा फुलांनी सजविली होती. सरस्वती मंदीर ट्रस्टच्या नव्या इमारतीत आज प्रथमच वर्ग भरले होते. महापौर नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या हस्ते घंटा वाजवून शाळा सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात महापौरांनी शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत अनेक आठवणी सांगितल्या. शिक्षकांचे संस्कार आहेत म्हणून शाळेचा एक विद्यार्थी महापौर झाला असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading