ठाणे स्मार्ट सिटीला दोन पुरस्कार संदीप माळवी देशातील सर्वात लोकप्रिय स्मार्ट सिटी सीईओ

स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्यावतीने, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट अर्बनेशन’ या परिषदेमध्ये ठाणे महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि. ने मोबिलिटी सोल्यूशन या प्रकारात पुरस्कार मिळविला. तसेच देशातील १०० स्मार्ट सिटीज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमधून देशातील सर्वात लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी हा सन्मानाचा पुरस्कार ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांना प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील हॅाटेल सहारा इंटरनॅशनल येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन परिषदेत स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक प्रताप पदोदे यांच्या हस्ते आणि ॲास्ट्रेलियास्थित एलव्हीएक्स ग्लोबल या कंपनीचे चेअरमन कोरी ग्रे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार स्वीकारण्यात आले. यावेळी महाराष्ट्रासह देशातील इतर स्मार्ट सिटीजचे सीईओज, वरिष्ठ अधिकारी, विविध प्रकल्प सल्लागार आदी उपस्थित होते.

प्रारंभी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये स्मार्ट सिटी मिशनतंर्गत महाराष्ट्राच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला तसेच महाराष्ट्र सरकारच्यावचीने सुरू असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सांगितली.

ठाणे शहरामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे.

स्मार्ट सिटीज कौन्सील इंडिया ही संस्था केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीज मिशनसोबत काम करीत असून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी स्मार्ट सिटी विशेष प्रकल्प पुकस्कार देण्यात येतात. यावेळी सन २०२२ सालच्या विविध प्रकल्पातंर्गत ठाणे स्मार्ट सिटीला ‘मोबिलिटी सोल्यूशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्यावतीने १०० स्मार्ट सिटीजमधून देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी या पुरस्काराने दरवर्षी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात येते. ॲानलाईन मतदानाच्या माध्यमातून या पुरस्काराची निवड केली जाते. सन २०२२ चा देशातील सर्वात लोकरप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठाणे स्मार्ट सिटी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading