ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार महिन्यात 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी पासून आतापर्यंत 165 जणांविरुद्ध 131 गुन्हे दाखल केले असून 1 कोटी 62 लाख 42 हजार 635 रुपये किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अमंली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांचा वापर, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात आला. जानेवारी ते आतापर्यंत 14 प्रकरणात 21 जणांना अटक करून त्यांच्याकडून 385 किलो 986 ग्रॅम गांजा, 6 जणांकडून 1 किलो 775 ग्रॅम चरस, 3 जणांकडून 147 ग्रॅम कोकेन, 9 प्रकरणात 15 जणांकडून 646 ग्रॅम 66 मि.ग्रॅ. मेफेड्रॉन, एल.एस.डी. चे 15 नगडॉट, 4 जणांकडून कफ सिरपच्या सहा हजार बाटल्या जप्त करण्यात आले असून अमंली पदार्थ सेवन करणाऱ्या 116 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रातील व्यसनमुक्ती केंद्रांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रत्येक महिन्यात तीन वेळा भेट द्यावी. तेथे दाखल असलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेवून त्यांची यादी बनवावी. तसेच त्यांच्याकडून अंमली पदार्थ विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत गोपनीय माहिती घ्यावी. तसेच व्यसनमुक्ती केंद्रांच्या अडचणीबाबत चर्चा करावी. कृषी विभागाशी समन्वय साधून खसखस आणि गांजाच्या लागवडी संदर्भात माहिती घेवून कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading