ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या रंगीत तालमीमुळं काही काळ गोंधळ

ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आल्यावर महापालिकेमध्ये एकच खळबळ उडाली. महापालिकेला सर्व बाजूंनी पोलीसांनी घेरले. अग्निशमन दलाच्या गाड्या, रूग्णवाहिका महापालिकेसमोर जमा झाल्या. महापालिकेसमोरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. हा काय प्रकार चालला आहे हे पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. थोड्यावेळानं हा प्रकार म्हणजे पोलीसांची रंगीत तालिम असल्याचं उघड झालं. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही रंगीत तालीम काहीशी अयशस्वी ठरल्याचंच दिसून आलं. ऐन कामाला जाण्याच्या वेळी हा प्रकार करण्यात आल्यामुळं सुरूवातीला कोणाला काय घडतंय याची कल्पनाच नव्हती. तर महापालिकेतील कर्मचा-यांना अशी रंगीत तालिम होणार असल्याची कल्पना होती. महापालिकेतील काही विभागांचे कर्मचारी बाहेर आलेच नाहीत तर अनेक कर्मचारी हसत हसत बाहेर पडत असल्यामुळे या रंगीत तालमीचं गांभीर्य हरवून गेलं. कर्मचारी कचराळी तलाव तसंच महापालिकेच्या समोरच उभे होते. महापालिकेला पोलीसांनी वेढा घातला होता. महापालिकेत जाणा-या येणा-यांची तपासणी केली जात होती. नंतर एक तासाच्या लुटूपुटूच्या लढाईनंतर एका अतिरेक्याला पोलीसांनी पकडून नेलं. तेव्हा ही रंगीत तालिम संपली. या रंगीत तालमीमुळं महापालिका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ऐन शाळेच्या वेळेत ही वाहतूक कोंडी झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांचेही हाल झाले. बेशिस्त वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीतही भर पडत होती. एकूणच पोलीसांची सक्षमता पाहण्यासाठी झालेली ही रंगीत तालिम त्यात गांभीर्य नसल्यामुळं काहीशी फसल्याची चर्चा होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading