ठाणे महापालिकेनं खाजगी हक्कांच्या जागांवर केलेल्या अनाठायी खर्चाची चौकशी करण्याची मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे. श्रीनगर येथे उभारलेलं हँगिंग गार्डन हे खाजगी मालमत्तेवर असताना त्यावर सव्वा पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले. या उद्यानावर कोट्यावधींचा खर्च झाल्यावर ही बाब उघडकीस आली. महापालिका अधिनियम १९४९ नुसार महापालिकेला स्वत:च्या जागेवरच खर्च करण्याचा अधिकार आहे. मात्र श्रीनगर येथील खाजगी मालमत्तेवर सव्वा पाच कोटी रपये खर्च करून ठाणेकरांच्या कष्टाच्या पैशांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्याची मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महापालिकेनं यापूर्वी विकास कामांच्या नावाखाली किती खाजगी मालक्की हक्काच्या जागांवर करदात्यांची पैशाची उधळपट्टी केली त्याचीही चौकशी करावी अशी मागणीही धर्मराज्य पक्षानं केली आहे.