ठाणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला एका वरिष्ठ अधिका-यानं मारहाण केल्यामुळं सुरक्षा रक्षकांनी काही काळ आंदोलन केलं होतं. ठाणे महापालिकेतील उपायुक्त संदीप माळवी यांच्या कांबळे या सुरक्षा रक्षकाला थोरवे नावाच्या सुरक्षा अधिका-यानं मारहाण केली. यामुळं संतप्त झालेल्या सुरक्षा रक्षकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ आंदोलन केलं. महापालिकेमध्ये दूरध्वनीवर बोलण्यावरून थोरवे आणि कांबळेमध्ये वादावादी झाली. या वादावादीत त्यांनी मारहाण केल्याचं या सुरक्षा रक्षकाचं म्हणणं होतं. थोरवे यांच्याबाबत सुरक्षा रक्षकांच्या ब-याच तक्रारी आहेत. रजा न देणे तसंच इतर काही कारणांवरून थोरवे यांच्याबाबत बरीच नाराजी आहे. थोरवे यांनी मारल्यानंतर महापालिकेतील सर्व सुरक्षा रक्षक एकत्र झाले आणि त्यांनी प्रवेशद्वारासमोर सकाळच्या सुमारास काही काळ आंदोलन केलं.