ठाणे महापालिकेच्यावतीने एकदाच वापरायच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत कार्यशाळेचे आयोजन

शहरात एकदाच वापरायच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या शाळा क्र. १८ मधील शालेय विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत असे प्लास्टीक न वापरण्याबाबत संकल्प केला. १ जुलैपासून देशात एकदाच वापरायच्या प्लास्टिक वापरावर बंदीबाबतची अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाद्वारे प्रसिध्द करण्यात आली असून त्यानुसार महापालिका क्षेत्रात एकल प्लास्टीक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची निर्मिती करण्यात आली असून या कृती दलाद्वारे महापालिका क्षेत्रात प्रत्यक्षपणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. एकदाच वापरायच्या प्लास्टिकवरील बंदीकरिता महापालिकेद्वारे सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, गृहसंकुलांच्या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात येत असून यामध्ये शासन निर्देशानुसार बंदी करण्यात आलेल्या एकदाच वापरायच्या प्लास्टिक वापराबाबत माहिती देण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे महापालिका शाळा क्र. १८ येथे शालेय विद्यार्थ्यांकरिता जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकदाच वापरायचे प्लास्टिक न वापरण्याबाबत संकल्प करुन माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेतली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading