ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षात 4 टन प्लॅस्टिक जप्त तर सव्वा बारा लाखांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदी बाबत कारवाई करण्यात येत असून 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यत एकूण अंदाजे 4 टन प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करण्यात आले तर सव्वा बारा लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून इतर पर्यायी वस्तूंचा वापर करावा आणि ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्याकरिता महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. यामध्ये मुख्यत: कटलरी वस्तू, पॅकेजिंग/ रॅपिंग फिल्म्स, पीव्हीसी बॅनर, सजावटीसाठी लागणारे पॉलिस्टीरिन, प्लास्टिक कॅरीबॅग, न विणलेल्या प्लास्टिक कॅरी बॅग, प्लास्टिक शीट इत्यादींचा समावेश आहे. 5 हजार आस्थापनांना भेटी देऊन नौपाडा- कोपरी प्रभाग समिती येथून एकूण 3200 किलो प्लास्टिक, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 450 किलो प्लास्टिक, माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून एकूण 3 हजार 190 किलो प्लास्टिक, वागळे इस्टेट प्रभाग समितीमधून एकूण 455 किलो प्लास्टिक, वर्तकनगर प्रभाग समितीमधून एकूण 350 किलो प्लास्टिक, कळवा प्रभाग समिती येथून एकूण 3 हजार 70 किलो प्लास्टिक, उथळसर प्रभाग समिती येथून 120 किला प्लास्टिक जप्त करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे प्रदुषण नियंत्रण विभाग आणि घनकचरा विभागाच्या माध्यमातून संयुक्तरित्या करण्यात आली. प्रदुषण नियंत्रण विभागाद्वारे संयुक्तपणे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक आणि सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यत 310 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्ती आणि 40 हजार इतकी दंड वसुली करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading