ठाणे महापालिकनेही गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवण्याची अविनाश जाधव यांची मागणी

विरार महापालिकेने गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. दरम्यान मुंबई, नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशाप्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा असेही अविनाश जाधव यांनी बोलताना सांगितले. कोरोनाचे सावट ओसरल्याने यंदा सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ‘ठाणे’ नगरीलाही दहीहंडीचे वेध लागले आहेत. वसई विरार महापालिकेने पालिका क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. अविनाश जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत केले असुन याच धर्तीवर ठाणे महापालिका आयुक्तांनी गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत अशी मागणी केली आहे. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदांच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणीही त्यांनी केली. दहीहंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावा असेही अविनाश जाधव म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading