ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन

ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन येत्या रविवारी करण्यात आलं आहे. श्रीनगरमधील श्रीनगर मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. या परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नगर रचनाकार आणि अभ्यासक चंद्रशेखर प्रभु उपस्थित राहणार आहेत. ठाणे महापालिकेतर्फे समूह विकास योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये किसननगर, कोपरी, हजुरी, लोकमान्यनगर, टेकडी बंगला आणि राबोडी येथे प्रायोगिक प्रकल्प केले जाणार आहेत. या भागातील नागरिकांना उठवून त्यांच्या इमारती पाडून त्या जागेवर नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत. त्या बदल्यात आज निवास करत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी लीज अथवा भाड्याच्या घरात रहावं लागणार आहे. अनेक सोसायट्यांच्या जमिनींचे मालकी हक्क जाणार आहेत. या बदल्यात नागरिकांच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाला ४ चटईक्षेत्र देऊन प्रचंड नफा कमावता येणार आहे. इतकी वर्ष राहत असलेल्या जागेत भाडेकरू म्हणून का रहायचे, बांधकाम व्यावसायिकानं नफा कमवायचा आणि रहिवाशांनी तोटा सहन करायचा हे कशासाठी आणि म्हणून शासन निर्णय बदलण्यासाठी संघटित होण्याकरिता या घरहक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेमध्ये समूह विकास योजना राबवल्या जात असलेल्या ६ विभागातील नागरिक आपल्या समस्या आणि प्रश्न मांडणार आहेत. या घरहक्क परिषदेमध्ये ठाण्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या संजीव साने यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading