ठाणे ग्रामीण पोलीसांनी सराईत गुन्हेगारास अटक करून हस्तगत केला लाखो रूपयांचा ऐवज

ठाणे ग्रामीण पोलीसांनी मीरा-भाईंदर परिसरात दुपारच्या वेळी बंद घराचे कडीकोयंडे तोडून घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास गजाआड करत लाखो रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर परिसरामध्ये या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळं ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे घरफोडी झालेल्या इमारतीच्या आवारातील रस्त्यांच्या सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करताना एक संशयित व्यक्ती चोरी करून बॅग पाठीला लावून रेल्वे स्थानकाच्या बाजूला चालत जात असल्याचं दिसलं. चोराचा सीसीटीव्ही तपासातून मागोवा घेता तो अंधेरी स्टेशनवर उतरत असल्याचं दिसून आलं. पण यापुढे तो कुठे जातो हे कळत नव्हतं. या व्यक्तीच्या मिळालेल्या छायाचित्रावरून त्याची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत होते. पोलीसांनी अंधेरी रेल्वे स्टेशनवर उतरून पूर्वेला चोरी करायला जाणारी ही व्यक्ती कुठे जाते याची तपासणी करण्याकरिता खाजगी सीसीटीव्ही बसवण्याबाबत प्रयत्न केले. त्याप्रमाणे १७ डिसेंबरला अंधेरी रेल्वे स्टेशनबाहेर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींची पाहणी करत असताना हवी असलेली व्यक्ती दिसली. त्यामुळं पोलीसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. पकडण्यात आलेल्या व्यक्तीने आपलं नाव राजेंद्र पटेल असं सांगितलं. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये घरफोडी करण्याची हत्यारं मिळाली. त्याने चोरी केलेल्या मालाची विल्हेवाट आपला साथीदार रोहित रेशीम याच्या मार्फत लावत असल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यालाही अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांकडून घरफोडीचे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले असून एकूण ३६ लाख १० हजार रूपये किंमतीचे १ किलो ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजारांचे चांदीचे दागिने असा ३६ लाख २० हजारांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading