ठाणे खाडी परिसरात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन

ठाणे खाडी परिसरात हिवाळ्यात अनेक पक्ष्यांचं आगमन होत असलं तरी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे खाडीत पक्षी निरिक्षणाची चांगली संधी पक्षीमित्रांना मिळते. गेल्या काही वर्षात ठाणे खाडीतील प्रदूषण कमी झाल्यामुळे आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडातील विविध पक्षी खाडीत तळ ठोकून असतात. फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी, कुरव यासारखे पक्षी पावसाळ्यातच दिसू लागल्याने यंदा थंडीची चाहूल लवकर येण्याची शक्यता दिसत आहे. हिवाळ्यात उत्तर भारताच्या इतर भागाबरोबरच युरोप, आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून शहराच्या विविध भागात स्थिरावतात. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुस-या पंधरवड्यातच पक्ष्यांचं आगमन झालं आहे. खाडीमध्ये फ्लेमिंगोचा वावर दिसत असून याबरोबरच कुरव सारखे पक्षी भिरभिरताना दिसत आहेत. फ्लेमिंगो बरोबरच सीगल्स, रानबदकं, सँड पायपर, पेन्टेड स्टार्क, स्पुन बिल सारख्या पक्षांसाठी ठाणे खाडी हा निवारा आहे. गेल्यावर्षी ठाणे खाडीत २०३ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. ठाणे महापालिकेनं कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ४० एमएलडी पाणी खाडीत सोडलं आहे. पण हे पाणी जलचरांसाठी पोषक ठरलं आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्यानं या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबी सारखे जीव वाढत आहेत. अशा जलचरांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी येताना दिसत आहेत. थंडीच्या दिवसात एकाच वेळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे थवे या ठिकाणी बघायला मिळत आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading