झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टी धारकांना नाहक वेठीस धरण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत – संजय केळकर

ठाण्यातील कोपरी आणि पाचपाखाडी परिसरातील झोपडपट्टीवासियांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत घरे मिळण्यास विलंब होत आहे. अनेक लाभार्थ्यांना विकासक घरभाडेदेखील देत नाही. अशा अनेक रहिवाश्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी शेकडो रहिवाशी आणि संबंधित विकासकाना सोबत घेऊन झोपु प्राधिकारणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी एसआरएमधील झोपडीधारकांना नाहक वेठीस धरण्याचे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट केले. तर एसआरए अधिकाऱ्यांनीही दिरंगाई करणाऱ्या विकासकांना तंबी दिली.
कोपरी परिसरातील धोबीघाट येथे एसआरए प्रकल्प सुरु आहे. हक्काचे घर मिळेल या आशेने आयुष्याची पुंजी बिल्डरच्या हातात देऊन शेकडो रहिवासी गेली अनेक वर्षे घराबाहेर राहत आहेत. मित्रधाम आणि समन्वय हौसिंग सोसायटीच्या माध्यमातुन एसआरए प्रकल्पाचे काम व्ही राज बिल्डकॉन कंपनीमार्फत विकासक राजेश गुप्ता राबवित आहे. यात ३५५ झोपडीधारक असून प्रकल्प चार वर्षाहुन अधिक काळ रखडला आहे.तसेच विकासकाने मागील १० महिन्यांचे आणि या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासुनचे घरभाडे लाभार्थ्यांना दिलेले नाही. तर पाचपाखाडी येथील ३०० लाभार्थी असलेल्या सरोवर दर्शन आणि साईदर्शन या एसआरए प्रकल्पातील रहिवाश्यांनाही विकासकाच्या दिरंगाईचा फटका सहन करावा लागत असल्याबाबतच्या तक्रारी केळकर यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काल शेकडो लाभार्थ्यांसमवेत ठाण्यातील एसआरए कार्यालयावर धडक मारून आमदार केळकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष विकासकांची बैठक घेत झोपडीधारकांना नाहक वेठीस न धरण्याबाबत सुनावले. तसेच, गोरगरीब झोपडीवासियांना आपल्या हक्काच्या घरभाड्यापासून वंचित ठेवु नये. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या परिपत्रका अन्वये थकीत घरभाडे एसआरए नियमांप्रमाणे त्वरित अदा करावे अन्यथा विकासक बदलण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असेही स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading