झुंडीने एकत्र आलेल्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांना घेराव घालून प्रसिद्धी मिळविण्याचे आंदोलन शिवसेना नगरसेवक-नगरसेविकांच्या अंगलट आले आहे. पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून झूंडीने आलेल्या शिवसेनेच्या ६ नगरसेवक-नगरसेविकांसह ३० ते ४० शिवसेना कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्यालयात जमलेल्या गर्दीची महापालिका अधिकाऱ्यांनीही गंभीर दखल घेऊन गेटवरील सुरक्षा रक्षकांना सेवेतून तत्काळ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, साधना जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, सिध्दार्थ ओवळेकर, शिवसैनिक राजू फाटक यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोंडावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवण्याबरोबरच मनाई आदेश असतानाही पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन घोषणा देणे आदींद्वारे मनाई आदेशाचा भंग आणि विनापरवाना एकत्र जमल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईबरोबरच महापालिकेनेही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गेटवरील सुरक्षा रक्षकांना तत्काळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुख्यालयात १२ मार्च रोजी जमलेल्या गर्दीची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी चौकशीनंतर गर्दीला मज्जाव न करणाऱ्या गेटवरील सुरक्षा रक्षकांना तत्काळ कमी करण्याचा आदेश काढण्यात आला. तसेच त्यांच्यावर कर्तव्य कसूरीबाबत योग्य कारवाई केली जाणार आहे. कोरोनाच्या आपत्तीत मोठ्या संख्येने कार्यालयामध्ये नागरिक येत असताना शिस्तीचे पालन न करण्याबरोबरच गेटवरील सुरक्षा रक्षकांनी आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचे निदर्शनास येत असल्याचा ठपका महापालिकेकडून ठेवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेकडून सिंघानिया स्कूल, घोडबंदर रोडवरील कार्मेल स्कूल आणि पंचामृत सोसायटी येथे ३ पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यातील दोन पूल मेट्रोच्या मार्गामुळे बाधीत होणार आहेत. या कामातून महापालिकेची १३ कोटी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करून ही कामे सत्ताधारी शिवसेनेकडून निवडणूक निधीसाठी केली जात असल्याचा घणाघाती आरोप डुंबरे यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवक-नगरसेविकांसह कार्यकर्त्यांनी झूंडीने येऊन डुंबरे यांना घेराव घातला होता. या आंदोलनाची माहिती मिळताच महापालिका मुख्यालयात पोचलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडविले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन नौपाडा पोलिस आणि महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading