जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला, आदिवासी आणि दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ

छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भागातील संरक्षित आदिवासी गट तसेच महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानंतर राबविलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या अर्हता दिनांकाऐवजी वर्षातील चार तारखा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर अर्हता दिनांक म्हणून घोषित केल्या आहेत. केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कातकरी, कोलाम, माडीया, गोंड या तीन आदिवासी जमातीमध्ये केला असून या समूहातील व्यक्तींची नावे मतदार नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गटातील मतदारांच्या नोंदणीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प, शहापूर या विभागाच्या यंत्रणेद्वारे विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये ४ हजार ३३१ इतक्या असंरक्षित आदिवासी गटातील मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली. या गटातील मतदार हे दुर्गम भागामध्ये, पाड्यांमधील रहिवास करत असतात. तसेच उदरनिर्वाहासाठी अशी माणसे कामानिमित्त स्थलांतर करत असतात. विशेष करून विटभट्टी मजूर म्हणून स्थलांतर करीत असतात. त्यामुळे अशा गटातील मतदारांची नोंदणी ही आव्हानात्मक असताना देखील ४ हजार ३३१ मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये महिला मतदारांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले. ज्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्याक्रमादरम्यान जिल्ह्याच्या महिला मतदारांच्या संख्येमध्ये ४० हजार २२६ ने वाढ झाली आण जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर २ ने वाढला आहे. जिल्हा तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकावर असून एकूण तृतीयपंथी मतदार नोंदणी १ हजार ७८ इतकी आहे. राज्याची तृतीयपंथी मतदारांची मतदार नोंदणी ४ हजार ७३५ असून त्यापैकी १ हजार ७८ इतक्या तृतीयपंथी मतदारांची नोंदणी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आली आहे. देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थामार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येवून मतदार नोंदणी करण्यात आली आहे. या मतदार नोंदणीमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात येवून मतदार नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या १६ हजार २६१, विशेष संक्षिप्त कार्यक्रमापूर्वी एकूण एफएसडब्ल्यू मतदारांची नोंदणी – १२ हजार २३०, विशेष संक्षिप्त कार्यक्रम दरम्यान झालेली मतदार नोंदणी १७१, एकूण झालेली एफएसडब्ल्यू मतदारांची नोंदणी – १२ हजार ४०१ झाली आहे. जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करून एकूण १६० इतकी बेघर मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांच्या नोंदणीमध्ये १ हजार ४५ वाढ झाली असून दिव्यांग मतदारांची संख्या ही ३२ हजार १३२ इतकी झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading