अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ठाण्यात रविवारी दुचाकी रॅलीचे आयोजन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताहाअंतर्गत उद्या शहरात रस्ते सुरक्षा आणि अवयवदान जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होवून अवयव दानाची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 17 जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे रस्ता सुरक्षा आणि अवयवदान जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सुरु होवून उपवन येथे संपेल. उपवन येथे अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या दात्यांची नोंदणी होऊन त्यांना युनिक नोंदणी क्रमांकाचे डोनर कार्ड वाटप केले जाणार आहे. ज्या नागरिकांना दुचाकी रॅलीमध्ये समाविष्ट व्हायचे नसेल परंतु अवयव दानाची प्रतिज्ञा घ्यावयाची असेल त्यांनी उपवन येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. रस्त्यावरील अपघातात जखमी व्यक्तींना अवयव दानाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने अवयवदानाचे महत्त्व आपल्या समाजात नसल्यामुळे अनेकजण वंचित राहतात. या वंचितांना अवयव प्राप्त झाल्यास त्यांना पुन्हा नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. तसेच आपण नेत्रदान आणि शरीरातील पेशींचे दान देखील करु शकता. त्यामुळे आपण जास्तीत जास्त 50 जीव वाचवू शकतो. जीवन मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या आजारी व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी आपले अवयवदान हे जीवनदायी ठरु शकते. याबाबतचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज, रोटरी क्लब क्लब ऑफ पॅशन, पिक्सन वेब बेस फोटोग्राफी कंपनी, रामसेना तसेच बोरिवली मेडिकल ब्रदरहुड असोसिएशन यांच्या संयुक्त उपक्रमाने ही दुचाकी वाहनांची रॅली आयोजित केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading