जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोविड रूग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची येत्या ३० मार्चला निवडणूक होत असून १५ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल एका पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी ६ संचालक बिनविरोध निवडून आले असून आता १५ जागांसाठी तिरंगी लढत अपेक्षित आहे. सहकार आणि महाविकास परिवर्तन अशी दोन पॅनल या बँकेच्या निवडणुकीत आहेत. एकूण ३ हजार ६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ३१ मार्चला मतमोजणी होणार असून साधारणत: २ वाजेपर्यंत निकाल हाती येईल अशी अपेक्षा निवडणूक निर्णय अधिकारी हौसारे यांनी व्यक्त केली. ऐन कोरोना काळात ही निवडणूक होत असून मतदानासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराचं तापमान मोजूनच त्याला मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. एकूण ३० मतदान केंद्र असून यासाठी ११० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोविड रूग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीतील शेवटचा अर्धा तास हा कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. अशा रूग्णांची विशेष काळजी घेऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार वापरता येईल असंही निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading