ठाणे महापालिकेचा ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडून महासभेला सादर

कोरोनामुळे महापालिकेने कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा २ हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु पालिकेच्या या अर्थसंकल्पात स्थायी समितीने तब्बल ४९१ कोटींची वाढ सुचविली आहे. त्यामुळे आता हा अर्थसंकल्प ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे. काल अर्थसंकल्पावरील विशेष महासभेत स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. यामध्ये मालमत्ता करात १०० कोटी, जाहीरात फी १७.६३ कोटी, सार्वजनिक बांधकाम १० कोटी, शहर विकास विभाग ३१३ कोटी, तर पाणी पुरवठा आकारात २५ आणि इतर ६ कोटी ३७ लाख अशी एकूण ४९१ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला २०२०-२१ चे २ हजार ८०७ कोटींचा सुधारित तर २०२१-२२ चे २ हजार ७५५ कोटीं ३२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. यावर स्थायी समितीत १५ दिवस चर्चा होऊन स्थायी समितीनं त्याला मंजुरी दिली होती. कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाच्या वतीने १३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे जे प्रकल्प सुरु आहेत त्या प्रकल्पांना देखील ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांनाही प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ करण्यात आली असल्याची माहिती संजय भोईर यांनी दिली आहे. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता करामध्ये १०० कोटी, जाहिरात फी मध्ये १७ कोटी ६३ लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाककडून १० कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी १९ कोटी, शहर विकास विभागाकडून ३१३ कोटी, पाणी पुरवठा विभागाकडून २५ कोटी इतर विभागाकडून ६ कोटी ३७ लाख असे ४९१ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading