जिल्हाधिका-यांच्या सतर्कतेमुळं आटगाव येथे मोठा अनर्थ टळला

आटगाव रेल्वे स्थानकाजवळ एक रिकामा गॅसचा टँकर अडकल्यानं उपनगरीय वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरुन एच.पी. कंपनीचा रिकामा गॅसचा टॅंकर तुर्भे येथे गॅस भरण्यासाठी जात होता. आटगाव जवळ भरधाव वेगात असताच या टँकरचा टायर फुटल्यामुळे गॅस टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर मुंबई-आग्रा महामार्गावरुन डिव्हायडर तोडून थेट आटगाव जवळ रेल्वे रुळावर जाऊन अडकला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला रुळावरील टँकर हटविण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलानं रात्री उशिरा हाटँकर बाजूला करून होणारा अनर्थ टाळला. हा टँकर रेल्वेरुळावर अडकण्याच्या 20 मिनिटांआधी एक उपनगरीय गाडी या मार्गावरून गेली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून तात्काळ उपाय योजना केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे मार्गात अडकलेला टँकर क्रेनच्या सहाय्यानं खेचून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली. ऐन घरी जाण्याच्या वेळी हा प्रकार झाल्यानं चाकरमानी गाड्यांमध्ये अडकले होते. या सर्वांची पर्यायी वाहनानं व्यवस्था करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading