जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

हर हर महादेव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. काही अटीशर्थींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाड यांना न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. आव्हाडांच्या वकीलांकडून न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. हर हर महादेव वाद प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटर वरून आपल्याला फसवून अटक करण्यात आल्याचा आरोप केल्यामुळे बराच गोंधळ उडाला. वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. तर मुंब्र्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आज सकाळी आव्हाड यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळीही मोठा जमाव जमला होता. आव्हाड यांच्या वतीनं प्रशांत कदम यांनी युक्तीवाद केला. आव्हाड आणि इतरांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे असल्याचं प्रशांत कदम यांचं म्हणणं होतं. हे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. तर आव्हाड यांनीही आपण स्वत: चौकशीसाठी आलो होतो असं सांगत तपासाला पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनाही काल अटक करण्यात आली होती. त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading