ग्रामीण भागातील जनतेचे जीवन प्रकाशमय करणार – मुख्यमंत्री

हर घर जल प्रमाणेच “हर घर ऊर्जा” हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात उर्जा महोत्सव घेवून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करीत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या ऊर्जा महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाच्या सभागृहात आयोजित ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ या कार्यक्रमास ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही, तर राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांनी प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र हे ऊर्जा क्षेत्रात संपुर्ण देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. राज्यातील औद्योगिक व कृषी व्यवसायाला नेहमीच पुरक असं ऊर्जा धोरण राबविण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वीज वितरण सुधारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे विज गळती आणि वितरणातील हानी कमी होईल, त्याचप्रमाणे राज्यातील ग्राहकांसाठी प्रिपेड – स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. याचा सुमारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील मीटर बसविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात केंद्रीय योजनांची कामे रखडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सचिवांना दिल्या आहेत. राज्यात पुढील काळात केंद्र आणि राज्य भागिदारीच्या योजना वेगाने मार्गी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, वीज वाहिन्या भूमिगत टाकण्याबाबत केंद्र शासनाची सागरतटीय राज्यातील शहरांसाठी असून या योजनेचा विस्तार करण्याची आवश्यकता असून राज्यातील महावितरणने याबाबत केंद्र शासनाला प्रस्ताव द्यावा. या योजनेचा विस्तार झाल्यास वीज वाहिन्या भूमिगत करता येतील आणि त्यामुळे पावसाळ्यात त्रास होणार नाही शिवाय वीजचोरीही रोखता येईल. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून शहापूरला ९ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणने जनजागृती अभियान घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले. गावांना सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून ठाणे जिल्ह्यात सुमारे १६० ग्रामपंचायती सक्षम असून त्या प्रस्तावित नवीन योजना राबवून ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण बनू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading