क्लस्टरवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

ठाणे महापालिकेनं क्लस्टर संदर्भात जाहिरात प्रसिध्द करून ठाणेकरांची दिशाभूल केली असून भोगवटाधारकांची यादी तयार नसतानाही जाहिरातबाजी करून ठाणे महापालिका आयुक्तांनी काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित करून ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालकमंत्र्यांनीच याबाबत सत्य सांगावं असं आवाहन केलं आहे. यामुळं एकप्रकारे क्लस्टरवरून शिवसेनेची कोंडी झाली आहे. ठाणे महापालिकेनं क्लस्टर संदर्भात भोगवटाधारकांची प्राथमिक यादी विविध प्रभाग समितीतील क्लस्टर कक्ष आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याचं आणि यासंदर्भात कुणाची काही हरकत अथवा सूचना असल्यास नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवेदन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मात्र अशी यादीच तयार नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे महापालिकेतील ८० टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र असताना नागरिकांच्या हरकती कोण नोंदवणार, तेव्हा सामान्य ठाणेकरांची दिशाभूल करणारी ही जाहिरात कुणाच्या सांगण्यावरून प्रसिध्दीस देण्यात आली. हा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग नाही का, की निवडणुकीचा जुमला करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात येत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप संजीव घाडीगावकर यांनी केला आहे. क्लस्टरच्या श्रेयासाठी पुढे असणा-या बॅनरबाज नेत्यांनी आणि विशेषत: पालकमंत्र्यांनी याबाबतचे सत्य ठाणेकरांना सांगावे अशी मागणी करून शिवसेनेची कोंडी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading