कोपरी पूलाच्या वाहतुकीचा एक टप्पा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्याची खासदार राजन विचारे यांची सूचना

कोपरी रेल्वे पूलाच्या तुळईचं काम तात्काळ पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी केली आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावर असलेल्या कोपरी रेल्वे पूलामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा अनुभव सध्या येत आहे. कोपरी पूलाजवळ हा पूल अरूंद असल्यामुळं या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते आणि त्याचा परिणाम इतर मार्गावर होतो. पूर्वद्रूतगती महामार्ग जवळपास सहा पदरी आहे तर कोपरी पूलावर हा मार्ग दुपदरी होतो. या पार्श्वभूमीवर हा पूल बांधण्याची गेली अनेक वर्ष मागणी होत होती. त्यातच हा पूल धोकादायक झाल्याचं लक्षात येताच खासदार राजन विचारे यांनी नवीन पूलाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळवली. यामध्येही अनंत अडचणी आल्या पण या सर्व अडचणींवर मात करून हा पूल मे २०२१ पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित असताना कोरोना त्यात मोठा अडसर ठरला. खासदार राजन विचारे यांनी महापौर, महापालिका अधिकारी, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पोलीस अशा सर्व संबंधित अधिका-यांसह या पूलाची काल पाहणी केली. या पाहणी दौ-यात विचारे यांनी ६५ मीटर लांबीच्या १४ तुळयांपैकी पहिल्या टप्प्यातील ७ तुळया डिसेंबर पर्यंत पूर्ण करून घ्याव्यात आणि त्यावर कॉन्क्रीटीकरणाचं काम करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना केली. त्याचप्रमाणे दुस-या टप्प्यातील तुळयांचं कामही तात्काळ सुरू करावे अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी या पाहणी दरम्यान दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading