कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं, जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करावी असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिला. महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली, पाणीबील आणि इतर वसुलीबाबत एक आढावा बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी विभाग निहाय वसुलीचा आढावा घेऊन वसुलीचं उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. कर वसुलीसाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कर निरिक्षकांनी आपल्या स्तरावर वसुलीसाठी कठोर पावलं उचलावी आणि जे कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देतानाच प्रभागनिहाय थकबाकी वसुली करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले. पाणीपट्टी वसुलीबाबत ज्यांनी पाण्याच्या बिलाचा भरणा केला नसेल त्यांची नळजोडणी खंडीत करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. महापालिका क्षेत्रातील वन विभागाची जमिन, किनारा नियमन क्षेत्र, गूरचरण, शासनाच्या जमिनी आणि इतर प्रतिबंधित क्षेत्रावरील बांधकाम धारकांना महापालिकेच्या पायाभूत सुविधांचा लाभ होत असल्यानं त्यांना सेवाशुल्क आकारणी करून त्याची वसुली करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading