कोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रूग्णांना सेवा देणा-या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीवरून सार्वजनिक आरोग्य विभागानं शासन परिपत्रक जारी केलं आहे. निरंजन डावखरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन वाढीची मागणी केली होती. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलं होतं. कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळं त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र त्यांना मिळणारं मानधन अत्यल्प होतं. एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही समान काम समान वेतन या तत्वावर मानधन देण्याची आवश्यकता आहे असं डावखरे यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं. राज्य सरकारनं कंत्राटी वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे मात्र बीएएमएस डॉक्टरांचा उल्लेख नसल्याचं आमदार डावखरे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानुसार आरोग्य विभागानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणा-या डॉक्टरांना ४५ हजार रूपये तर इतर भागात काम करणा-या डॉक्टरांना ४० हजार रूपये एवढे मानधन मिळणार आहे. त्यामुळं ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील रूग्णांना आरोग्य सुविधा मिळणार असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading