कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची ठाण्यात बैठक – राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी

कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेसने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी अवतरणार आहे. ठाण्यात विस्तारीत कार्यकारणीची बैठक येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहीती शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत शहर काॅग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सदस्य रमेश इंदिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यानी सागितले की, कॉंग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष,सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथे ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठरावही केले जाणार असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच या निमित्ताने जय भारत यात्रेचा शुभांरभ केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी सत्याग्रह आणि स्वातंत्रविरांची रॅली काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून गटबाजीला तिलांजली दिली जाणार असून मतदारापर्यंत पोहोचण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असणार आहे. एकूणच गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी जनतेची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आता कॉंग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी कॉंग्रेसने देखील ठाण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे या विस्तारीत कार्यकारणीच्या बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेस शक्तीप्रदर्शनही करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading