कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्री रामाची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली. या चित्रप्रदर्शनाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. रामाच्या अनेक गोष्टी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. प्रभू रामाची विविध रूपे, मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम, समूह शक्तीच्या जोरावर सेतू बांधणारा, अधर्माचा नाश करणारा, रावणाचा वध करून लंका जिंकल्यानंतरही तेथील जनतेला म्हणजेच भूमिपुत्रांना राज्य करता यावे, यासाठी विभिषणाला राज्य प्रदान करणारे प्रभू श्री राम आहेत . या विविध रूपातील राम जनतेला आवडत असतो असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं. गुन्हे दाखल केले जात असल्याबाबत विचारले असता, आपण एखादे विधान केले तर माझ्याविरुद्ध आंदोलन करणारी लॅाबी कामाला लागते. त्यामुळे आगामी काही दिवसात आपणावर शंभर एफआयआर दाखल होतील. पण आपण लढायचे आहे, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून श्री राम या मुद्यावर वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या वादाला उत्तर देण्यासाठी हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सीतास्वयंवर, पित्याचे आदेश पालन करणारे श्रीराम, शबरीची बोरं खाणारे श्रीराम, भरतास दिशा देणारे राम, पत्नी हट्ट पुरवणारे श्रीराम, विनम्रता धारण करणारे राम, विभिषणाला मार्गदर्शन करणारे राम, रामसेतू उभारणारे, जटायूला मायेने गोंजारून काळजी वाहणारे राम , सीतेच्या अग्नीपरिक्षेदरम्यान व्याकूळ झालेले श्री रामच्या अशा विविध रूपांचे दर्शन या चित्रप्रदर्शनातून घडविण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading