काक लेहर शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत दिली जात नाही तर मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली ही सर्वात मोठी सेवा आहे – महापालिका आयुक्त

काक लेहर शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत दिली जात नाही तर मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली ही सर्वात मोठी सेवा आहे. आम्ही स्वीकारलेला मानवतेचा हा मार्ग सर्व देशभर पसरू दे आणि कर्णबधीर मुलांचे विश्व उजळून निघू दे असे भावपूर्ण उद्गार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काढले. कर्णबधीर मुलांवर काक लेहर शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात व्हावी. यामध्ये जास्तीतजास्त डॉक्टर निष्णात व्हावे यासाठी डॉ. प्रदीप उप्पल यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देशातील विविध तज्ञ डॉक्टरांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या डॉक्टरांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी बोलताना त्यांनी हे भावपूर्ण उद्गार काढले. ठाणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे जी अशाप्रकारच्या उपक्रमांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करते. पण या उपक्रमाची अंमलबजावणी देशभर व्हायला हवी. डॉ. उप्पल यांच्यासारखे डॉक्टर देशभर तयार व्हायले हवेत. तसे झाले तर कर्णबधीर मुलांच्या आयुष्यामध्ये नवीन पहाट उजाडेल असं त्यांनी सांगितलं. देशभरात काक लेहर इम्प्लांट सर्जरी करणारे डॉक्टर केवळ एक टक्काच आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १२० च्या वर शस्त्रक्रिया डॉ. उप्पल यांनी केल्या आहेत. ही शस्त्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये नेपाळसह उत्तरप्रदेश, दिल्ली, चंदिगड, हैद्राबाद, बंगलोर अशा ठिकाणाहून १० डॉक्टर सहभागी झाले होते. डॉ. उप्पल यांनी कानाची थ्रीडी प्रतिमा तयार करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading